( मुंबई )
निसर्गरम्य प्रवासाचा अनोखा अनुभव देणाऱ्या मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांना गेल्या तीन वर्षांत प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई-पुणे घाट विभाग, कोकण मार्ग आणि पुणे-सिकंदराबादसारख्या आकर्षक रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या या विशेष डब्यांमुळे प्रवासी संख्या, महसूल आणि आसन भराव दरात सातत्याने वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण 11 हजार 878 व्हिस्टाडोम फेऱ्या चालवल्या. या फेऱ्यांमधून तब्बल 5 लाख 33 हजार प्रवाशांनी प्रवास केला असून मध्य रेल्वेला 81.29 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे अनेक मार्गांवर व्हिस्टाडोम डब्यांचा आसन भराव दर 100 टक्क्यांपेक्षाही जास्त नोंदवण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3,982 फेऱ्यांमधून 1 लाख 76 हजार 404 प्रवाशांनी प्रवास केला. या वर्षात 26.50 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून आसन भराव दर 91.36 टक्के होता. त्यानंतर 2024-25 मध्ये 3,930 फेऱ्यांमध्ये 1 लाख 76 हजार 608 प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत महसूल 26.83 कोटी रुपयांवर पोहोचला, तर आसन भराव दर 92.56 टक्क्यांपर्यंत वाढला.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये व्हिस्टाडोम सेवेला आणखी मोठा प्रतिसाद मिळाला. या वर्षात 3,966 फेऱ्यांमधून 1 लाख 80 हजार 466 प्रवाशांनी प्रवास केला. यामधून मध्य रेल्वेला 27.96 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून आसन भराव दर 93.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काचेचे छत, मोठ्या पारदर्शक खिडक्या, 180 अंश फिरणाऱ्या आरामदायी खुर्च्या, निरीक्षण गॅलरी, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित सुविधा, आधुनिक स्वच्छतागृहे आणि सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा या डब्यांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
विशेषतः मुंबई-मडगाव कोकण मार्ग आणि मुंबई-पुणे घाट विभागातील डोंगररांगा, धबधबे, बोगदे आणि हिरवाईचा नयनरम्य नजारा या डब्यांतून अधिक जवळून अनुभवता येत असल्याने पर्यटक आणि प्रवासी मोठ्या प्रमाणावर या सेवेला पसंती देत आहेत.
मध्य रेल्वेकडून भविष्यातही अशा प्रीमियम आणि पर्यटनाभिमुख सेवांचा विस्तार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. वाढती प्रवासी संख्या आणि सातत्याने वाढणारा महसूल पाहता व्हिस्टाडोम सेवा रेल्वेसाठी फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

