(गुहागर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील आरे–पाटपन्हाळे मार्गावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धाडसी घटना गुरुवारी घडली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरदिवसा अशा प्रकारची गुन्हेगारी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या प्रकरणी सौ. अवनी समीर पागडे (वय ३६, रा. वाकी, पो. आरे स्वातंत्र्यवाडी, ता. गुहागर) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकी–पिंपळवट सीमेवर किराणा दुकान चालविणाऱ्या सौ. पागडे या गुरुवारी दुपारी दुकान बंद करून आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी आरे–पाटपन्हाळे मार्गाने पायी जात होत्या. त्याचवेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येत क्षणार्धात गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि पाटपन्हाळेच्या दिशेने वेगाने पसार झाला. आरोपीने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला होता, तर डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. त्यामुळे आरोपीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. चोरट्याने लंपास केलेले मंगळसूत्र हे एक पदरी असून त्यामध्ये काळे व सोन्याचे मणी गुंफलेले आहेत. त्यास एक डवळी (वाटी) असून त्याचे वजन सुमारे पाच ग्रॅम आहे. जुन्या वापरातील या दागिन्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर धास्तावलेल्या सौ. पागडे यांनी तातडीने गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६८/२०२६ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीचा मागोवा आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा निर्जन मार्गावर घडलेल्या या धाडसी साखळी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातही पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

