(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात येत्या शनिवारी (२५ऑक्टोबर) श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तपीठावर मासिक महासत्संग आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने भव्य दिव्य दीपोत्सव, श्रीघोर कष्टोद्धारक पादुका पूजन सोहळा, भीमा अमरजा नदी संगमावर पूजन आणि दत्तात्रय वज्रकवच पठण आदी सेवांचेही आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाप्रमाणेच श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवामार्गतर्फे भव्य दत्तपीठ उभारण्यात आले आहे. श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथातील ४८ व्या अध्यायामध्ये पर्वतेश्वर नामक शेतकऱ्याच्या शेतावर श्री दत्त महाराज कृपादृष्टी टाकतात अशी कथा आहे. त्याच पवित्र जागेवर सेवामार्गाच्या दत्तपीठाची निर्मिती झाली आहे. अशा सदैव दिव्य आणि चैतन्यदायी स्पंदनांनी भारलेल्या दत्तपीठामध्ये २४ ते २६ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस विविध कार्यक्रम आणि सेवा संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांची पावन उपस्थिती लाभणार असल्यामुळे या सर्व कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
२४ रोजी नदी पूजन आणि दीपोत्सव सोहळा
श्री क्षेत्र गाणगापूर येथे २४ ऑक्टोबर रोजी भीमा- अमरजा संगमावर नदी पूजनाचा कार्यक्रम होईल. त्याच दिवशी सायंकाळी दत्तपीठावर लक्ष दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा दीपोत्सव साजरा करण्यात येईल. भक्ती ,श्रद्धा आणि प्रकाशाच्या तेजाने भारावलेल्या चैतन्यदायी वातावरणात वेदमंत्रांच्या जयघोषात हा नेत्रदीपक सोहळा “याची देही याची डोळा” पाहण्याचे भाग्य सेवेकऱ्यांना लाभणार आहे.
२५ रोजी मासिक महासत्संग व हितगुज
सेवामार्गाचा मासिक महासत्संग २५ ऑक्टोबर रोजी गाणगापूर दत्तपीठावर होईल. त्यानिमित्ताने भूपाळी आरती नंतर लगेचच श्री दत्तात्रय वज्रकवच पठणाची सामूहिक सेवा घेण्यात येणार आहे. या सेवेनंतर श्री सत्यनारायणाची महापूजा होईल. सकाळी १०:३०च्या आरतीनंतर गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या अमृततुल्य हितगुजाचा सेवेकरी लाभ घेतील. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
२४ ते २६ श्री घोरकाष्टोद्धारक पादुका पूजन
ऑक्टोबरच्या मासिक महासत्संगानिमित्त गाणगापूर दत्तपीठावर भक्तांचे कष्ट दूर करणारा श्रीघोर कष्टोद्धारक पादुका पूजनाचा सोहळा २४ ते २६ ऑक्टोबर असा सलग तीन दिवस घेण्यात येणार आहे. या सेवेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.या गुरुपादुका पूजनात सेवेकरी, भाविक, भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जपाची सेवा
धर्म, देश आणि समाज हितासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्व सेवेकऱ्यांना बारा लक्ष “श्री स्वामी समर्थ” जप लिहिण्याची आज्ञा केली होती. ही सेवा पूर्ण करणाऱ्या सेवेकर्यांनी जपाच्या वह्या गाणगापूर दत्तपीठावर जमा कराव्यात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी अब्जचंडीची सेवाही लवकरात लवकर पूर्ण करावी असे कळविण्यात आले आहे.
गुरुप्रसाद दिवाळी फराळाचे वाटप
गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपुलकीची दिवाळी अभियानांतर्गत अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी पाडे, अंध, अपंग कर्णबधिर विद्यालयांमध्ये गुरुप्रसाद दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत आहे. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रतिनिधी सेवेकरी ठिकठिकाणी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करीत आहेत.

