(छत्रपती संभाजीनगर)
इयत्ता बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानली जाते. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहावे, यासाठी परीक्षा अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी कडक नियम, सीसीटीव्ही देखरेख आणि काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात असतो. मात्र, तरीही काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडत असल्याचे प्रकार समोर येतात आणि अशा घटनांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाते.
असाच धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आला असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित १२ वीच्या परीक्षेत गैरप्रकारांना खतपाणी घातल्याप्रकरणी 18 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा अन् सर्जिकल कारवाई
दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्याबाबत आधीच कडक सूचना दिल्या होत्या. तरीही कन्नड तालुक्यातील जेवपूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्ली होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, परीक्षा केंद्रावर उपस्थित काही शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. त्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
18 जण निलंबित; मुख्यालय सोडण्यास मनाई
या प्रकरणात दोषी आढळलेल्या 17 शिक्षकांसह एका सेवकाला निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये निर्मळ भगवान, सचिन सातदिवे, नरेश सोनवणे, छाया मुंगे यांच्यासह एकूण 18 जणांचा समावेश आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधितांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, कोणतीही खाजगी नोकरी किंवा सेवा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन झाल्यास आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या धडक कारवाईमुळे कॉपीप्रकरणांना पाठबळ देणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, बोर्ड परीक्षांतील गैरप्रकारांवर प्रशासनाची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

