(ठाणे / वार्ताहर)
दिवाळीच्या सणानिमित्त संस्कृती, परंपरा आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत लहान मुलांनी आकर्षक गड-किल्ले साकारले असून, महिला आणि तरुणींनी रंगीबेरंगी रांगोळ्यांमधून आपली कलात्मकता सादर केली आहे. जनसेवक तथा ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी स्वतः वेळ काढून विविध ठिकाणी भेट देत या कलाकृतींची पाहणी केली. त्यांच्या भेटीमुळे चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
स्व. बारकू वैती प्रतिष्ठान, ठाणे आणि श्री साईधाम आनंद संस्था, काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळ, ठाणे विभाग क्रमांक १३ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३८ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही सांस्कृतिक परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा ‘दिवाळी निमित्त भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धा २०२६’च्या माध्यमातून परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांनी कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयीची आत्मीयता आणि स्वराज्याची प्रेरणा दिसून येत आहे. दुसरीकडे, महिलांनी आणि तरुणींनी विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले आहे.
या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन जनसेवक तथा ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन किल्ले आणि रांगोळी सजावटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. स्वतः साकारलेल्या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी अशोक वैती आल्याने मुलांना विशेष आनंद झाला. त्यांच्या कौतुकाच्या शब्दांमुळे स्पर्धकांचा उत्साह वाढण्यासोबतच त्यांना पुढील काळातही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
किल्ला स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ३,३३३ रुपये, द्वितीय क्रमांकाला २,२२२ रुपये आणि तृतीय क्रमांकाला १,१११ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २,२२२ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १,१११ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
८ ते १० नोव्हेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नागरिकांना किल्ले आणि रांगोळी सजावट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. साईनाथ नगर, रमाबाई नगर, लुईसवाडी, जिजामाता नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी आणि वैतीनगर या परिसरांत हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा समारोप १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक चौक, काजूवाडी, ठाणे येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याने करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी, सणांच्या परंपरांशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून होत आहे. गेल्या ३८ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून सामाजिक एकोपा वाढविणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि मुलांमध्ये ऐतिहासिक जाणीव निर्माण करणे, या उद्देशाने राबविली जात आहे. मुलांनी साकारलेले गड-किल्ले आणि रांगोळ्यांमधून व्यक्त केलेली कलात्मकता यांना प्रोत्साहन देणे हाच या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.
या उपक्रमाचे आयोजक व अध्यक्ष अशोक बारकू वैती यांनी स्पर्धेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.


