(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-बोरभाटलेवाडी येथे सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) सकाळी विहिरीत पडल्याने प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३, रा. नाखरे-बोरभाटलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने नाखरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आडविलकर या गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान त्या घराबाहेर पडल्या होत्या. याचवेळी त्या विहिरीच्या दिशेने गेल्या असता विहिरीत पडल्याची घटना घडली. त्या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांनी प्रयत्न करून त्यांना विहिरीतील पाण्याबाहेर काढले आणि तातडीने पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
या घटनेची माहिती मृत प्रियांका यांचे वडील लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, पावस येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अ.मृ. क्रमांक ४१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


