(ठाणे)
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह सहा राज्यांत ४,५९८ वनराई बंधारे उभारण्यात आले. या विक्रमी जलसंधारण उपक्रमाच्या संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन ठाणे येथील टीपटॉप प्लाझा येथे उत्साहात पार पडले.
या सोहळ्यास जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह सौ. अमृता फडणवीस आणि राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कच्चे वनराई बंधारे उभारण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रामानंदाचार्य सांप्रदायाच्या पीठे, जिल्हा समित्या, तालुका संघटना आणि सेवा केंद्रांचा सन्मान करण्यात आला.
हा उपक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून ७ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्रासह सहा राज्यांत हे वनराई बंधारे बांधण्यात आले. अल्प कालावधीत पूर्ण झालेला हा उपक्रम जलसंधारण क्षेत्रातील एक उल्लेखनीय उदाहरण ठरला आहे.
यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, “जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेले निसर्गरक्षण व देशहिताचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. शासनाच्या उपक्रमांच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संरक्षणाचे कार्य त्यांनी घडवून आणले आहे. हे कार्य अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे.”
सौ. अमृता फडणवीस म्हणाल्या, “जगद्गुरूंनी अध्यात्माबरोबरच लोकांच्या जीवनशैलीत आणि विचारसरणीत सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यांच्या प्रेरणेतून उभारलेले हे वनराई बंधारे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. जनकल्याणासाठी दिलेल्या त्यांच्या संकल्पनांमधून प्रेरणा घेऊन समाजाने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.”
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आपल्या आशीर्वादपर मनोगतात सांगितले, “हे हजारो वनराई बंधारे सजीव सृष्टीसाठी संजीवनी आहेत. आजचा दिवस मानवधर्म आणि राष्ट्रधर्म यांच्या मिलाफाचा ऐतिहासिक क्षण आहे. माझ्या अनुयायांनी श्रमदानातून भगिरथ कार्य केले आहे. पाणी अडवून आणि जिरवून धरणीमातेला अभिषेक घालण्याचे हे कार्य आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात माणसांसह पशुपक्ष्यांनाही पाणी उपलब्ध होणार असून भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या विहिरींचा पाणीसाठा वाढला आहे. ज्यांनी दगड-माती उचलून, चिखलातून कच्चे बंधारे उभारले, ते हात खऱ्या अर्थाने पवित्र झाले आहेत.”
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांतील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकर्षक संतपीठ उभारण्यात आले होते. वनराई बंधारे उभारणीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

