(मुंबई)
सध्याच्या डिजिटल आणि एआयच्या युगात जग हायटेक झाले असले तरी, त्याहून अधिक हुशारीने फसवणूक करणारे चोरटे पुढे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाईंदर पोलिसांनी अशाच ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात दोन शातीर आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २८ महागडे मोबाईल फोन आणि ४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ चे उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.
कशी झाली फसवणूक?
भाईंदरमधील एका नागरिकाने “ऑनलाईन मोबाईल फोन खरेदी केला नसताना बँक खात्यातून पैसे वळते झाले” अशी तक्रार पोलिसांकडे केली होती. चौकशीत समोर आले की, संबंधित मोबाईल फोनची डिलिव्हरी एका व्यक्तीने रस्त्यावर घेतली होती.
तपासात उघड झाले की, आरोपी नागरिकांना CRED.Apk, MParivahan Fake UI.Apk, Adult Chat.Apk यांसारख्या बनावट अॅप्सच्या लिंक्स पाठवायचे. या अॅप्सद्वारे मोबाईलमध्ये प्रवेश करून ते OTP, बँक अकाऊंट माहिती आणि अन्य संवेदनशील डेटा मिळवायचे. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग, SMS फॉरवर्डिंग, UPI पिन ग्रॅबर, जीमेल व कॉन्टॅक्ट लिस्ट अॅक्सेस, पासवर्ड बदलणे अशा फिचर्सचा गैरवापर करून नागरिकांच्या खात्यातून थेट ई-कॉमर्स कंपन्यांकडे पैसे वळवले जात. त्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करून ते आरोपी इतरांना विकून दुहेरी फसवणूक करीत होते.
गुन्हा दाखल
या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात कलम ३१८ (४), ३ (५) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

