( पुणे )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी) दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर
पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी मंडळाच्या अधिकाऱ्यांना एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली. तपासणी केली असता त्या ग्रुपवर दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका आधीच टाकण्यात आल्याचे आढळले. माहितीनुसार, ६ मार्चला होणारा गणित भाग-१ चा पेपर ५ मार्च रोजी रात्री ८.३७ वाजता ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता. तर ९ मार्चचा गणित भाग-२ चा पेपर ६ मार्च रोजी दुपारी ४.५६ वाजता, म्हणजेच तब्बल तीन दिवस आधीच उपलब्ध करण्यात आला होता.
अधिकृत पेपरशी तंतोतंत जुळले
या ग्रुपवर टाकण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आणि मंडळाने अधिकृतपणे दिलेल्या प्रश्नपत्रिकांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही पेपर तंतोतंत समान असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
टेलिग्राम ग्रुप अॅडमिनवर गुन्हा
या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी तातडीने पावले उचलत शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पेपर नेमका कोठून आणि कसा लीक झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.

