(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरालगतच्या जाकीमिऱ्यातील (आलावा) तळेकरवाडी परिसरातून ३८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पत्नीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत पतीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
श्रावणी योगेश तांडेल (वय ३८) असे अपहरण झाल्याची तक्रार असलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती योगेश भिकाजी तांडेल (वय ५१, रा. जाकीमिऱ्या (आलावा), तळेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास श्रावणी तांडेल या घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून त्यांचे अपहरण केल्याचा संशय पतीने फिर्यादीत व्यक्त केला आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासह पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


