(ठाणे)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो नागरिक अडचणीत सापडले असून हजारो घरांमध्ये पाणी शिरले आहे. सरकारी मदत जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात ती पोहोचण्यात विलंब होत असल्याने धाराशिवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेऊन मदत पाठवली आहे. धान्य, कपडे, गृहउपयोगी भांडी आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अशी मदत ठाण्यातून जवळपास ६० वाहनांमधून धाराशिवला रवाना करण्यात आली आहे.
अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला
पूरामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाला मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेजारील भाग आणि ठाण्यातून मदतकार्य सुरू झाले आहे. मात्र, सध्याची मदत पूरग्रस्तांच्या गरजांच्या तुलनेत अपुरी असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी केरळ, कोल्हापूर आणि जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तींमध्येही ठाणे जिल्ह्यातून मदत पोहोचवण्यात आली होती. त्याच परंपरेत या वेळीही प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून व्यवस्थित पॅकिंग आणि लेबलिंगसह मदत धाराशिवला पाठवली.
सरकारी मदत वेळेत न मिळाल्याने धाराशिवमध्ये नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यात मुसळधार पावसामुळे मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी शिवसेना नावाचे लेबल असलेले आणि प्रचाराचा हेतू असलेली मदत नाकारत थेट नाराजीही व्यक्त केली.

