(पुणे)
भोंदूगिरी, जादूटोणा आणि मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याच्या आरोपांमुळे अशोक खरात याच्याविरोधातील तपास अधिक तीव्र झाला आहे. पुण्यातील एका लॉजिस्टिक्स व्यावसायिकाकडून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये उकळल्याच्या नव्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार राजेंद्र जासूद यांना व्यवसायात परदेशात मोठं यश मिळवून देण्याचं आमिष दाखवत खरातने फसवणूक केल्याचा आरोप आहे. “अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल”, “नागदेवतेच्या शापाने सर्वनाश होईल” अशा धमक्या देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.
काय आहेत प्रमुख आरोप?
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार—
- मिरगावमध्ये फार्महाऊस उभारण्यासाठी १ कोटी ११ लाख रुपये उकळले
- “नकारात्मक ऊर्जा शोषणारे” फर्निचर तुर्कस्तानातून आणण्याचा सल्ला देत ९० लाख खर्च करायला भाग पाडले
- पुण्यातील टिंबर मार्केटमधून २९ लाखांचे सागवानी लाकूड खरेदी करण्यास सांगितले
- “अवतार पूजा”च्या नावाखाली २१ देशांची भ्रमंती घडवून कोट्यवधी रुपये घेतले
या प्रकरणात एसआयटीने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपी आणि फिर्यादीला समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, व्यावसायिकाला जागतिक स्तरावर व्यवसाय उभारण्यासाठी “अवतार पूजा” आवश्यक असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली. इशानेश्वर मंदिरात बोलावून नकली साप दाखवणे, २१ देशांत न गेल्यास नागदंशाने मृत्यू होईल अशी भीती निर्माण करणे, अशा प्रकारे मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
खरातच्या वकिलांनी फिर्यादीने दिलेले पैसे हे “गिफ्ट” स्वरूपात दिले असल्याचा दावा केला आहे. मात्र तपास यंत्रणांनी हा युक्तिवाद फेटाळत फसवणुकीचा ठोस पुरावा असल्याचे न्यायालयात मांडले. या प्रकरणात पुढील चार दिवस अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. एसआयटी आता पैशांचा प्रवाह, परदेश दौऱ्यांचा तपशील आणि तथाकथित पूजांच्या नावाखाली नेमकी कोणती फसवणूक झाली याचा सखोल तपास करणार आहे.
खरातने धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांकडून पैसे उकळले, असा आरोप ईडीने केला आहे. पीडितांकडून जमा केलेला निधी स्थावर मालमत्तेमध्ये (रिअल इस्टेटमध्ये) गुंतवला गेल्याचेही तपासात उघड झाले आहे. या मालमत्ता एकतर खरातच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. एप्रिल महिन्यात त्याच्या निवासस्थानी आणि कार्यालयात घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान, स्थावर मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच निधीचा स्त्रोत शोधण्यासाठी या कागदपत्रांची सध्या कसून छाननी केली जात आहे.
तपासातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘ईडी’च्या माहितीनुसार, खरातने विविध व्यक्तींच्या नावावर सुमारे 60 बँक खाती उघडली होती. ही सर्व खाती त्याच्या स्वतःच्याच मोबाईल क्रमांकाशी जोडलेली होती आणि या सर्व खात्यांसाठी तो स्वतःच एकमेव ‘नॉमिनी’ (वारसदार) होता. शिवाय, 2021 मध्ये त्याने एका सहकारी पतसंस्थेत (क्रेडिट सोसायटीमध्ये) अवघ्या एकाच दिवसात 43 खाती उघडली होती. ही खाती भक्तांच्या आणि इतर व्यक्तींच्या कागदपत्रांचा वापर करून, त्यांच्या माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून 70 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचेही उघडकीस आले आहे.
महिलांच्या लैंगिक शोषणासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आधीच आरोपी असलेल्या अशोक खरात याच्यावर आता आर्थिक फसवणुकीचेही गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.

