( मुंबई )
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतून त्रिभाषा धोरण सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सरकारने माघार घेतली. हा निर्णय मागे घेतल्यानंतर आता या लढ्याचा विजय साजरा करण्यासाठी भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनासाठी बैठका सुरु असून, मेळाव्याच्या तयारीला मोठं गती मिळाली आहे.
पहिल्यांदाच एकत्र आवाहन
‘आवाज मराठीचा!’ या शीर्षकाखाली राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत मराठी जनतेला भव्य मेळाव्यासाठी आवाहन केलं आहे. “वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…” असं या पत्रकात ठाकरेंनी म्हटलं असून, हे पत्रक सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पत्र “जय महाराष्ट्र” या दोन शब्दांच्या कॅप्शनसह एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर केलं.
पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
“मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो… सरकारला नमवलं का? हो, नमवलं! आणि ते कोणी केलं? तर तुम्ही – मराठी जनतेनेच! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. त्यामुळे या विजयाचा आनंदही तुम्हीच साजरा करायचा आहे.
आम्ही केवळ मेळाव्याचे आयोजक आहोत, पण जल्लोष, गुलाल, ढोल-ताशे तुमचे आहेत! वाजत गाजत या… गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय!”
असं ठाकरेंच्या संयुक्त पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
विजयी मेळावा कुठे आणि कधी?
हा भव्य विजयोत्सव ५ जुलै रोजी मुंबईच्या वरळीतील डोम सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रितपणे उपस्थित राहणार आहेत.
संजय राऊत यांनी याला “मराठीच्या मारेकऱ्यांना दिलेलं प्रत्युत्तर” आणि “महाराष्ट्राच्या शत्रूंना दिलेला आवाज” असं संबोधलं आहे.
राजकीय नव्या समीकरणांचे संकेत?
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या एकत्रित आंदोलनातून महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ जुलैचा विजयोत्सव केवळ एका लढ्याचा विजय नसेल, तर तो आगामी घडामोडींसाठी एक निर्णायक टप्पा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

