( जैतापूर / राजन लाड )
नाटे येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण आगीत स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या संकटाच्या पार्श्वभूमीवर नाटे व्यापारी मंडळ तत्काळ पुढे सरसावले आणि मदतीसाठी फंड रेसिंग मोहिम राबवली. अध्यक्ष रमेश लांजेकर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नुकसानग्रस्तांना दिलेली मदत :
संकलित निधी नुकताच खालील व्यापाऱ्यांना मदतीच्या स्वरूपात वितरित करण्यात आला:
1. नारायण गोसावी – ₹1,00,000/- (धनादेश)
2. प्रसाद पाखरे – ₹55,000/- (धनादेश)
3. प्रदीप मयेकर – ₹20,000/- (रोख)
4. भिम खंडी – ₹10,000/- (रोख)
5. दिगंबर गिजम – ₹5,000/- (रोख)
मदतीचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडले. व्यापारी मंडळाचे पदाधिकारी स्वतः लाभार्थ्यांच्या भेटीला गेले, त्यांना सांत्वन दिले आणि या संकटसमयी भक्कम आधार दिला. लाभार्थ्यांनीही यावेळी समाधान व्यक्त करत व्यापारी मंडळाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा एकजुटीचा आणि सहवेदनेचा प्रत्यय नाटे गावाला सामाजिक सलोख्याची नवी ओळख देणारा ठरत आहे.
या उपक्रमातून नाटे व्यापारी मंडळाने सामाजिक बांधिलकीचे उज्वल उदाहरण साकारले आहे. संकटकाळात समाजाच्या मदतीला धावून आलेल्या सर्व दात्यांचे व्यापारी मंडळातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
अपूर्वा सामंत यांचे विशेष योगदान
या आगीत एक महिला ब्युटी पार्लर व्यावसायिकाचेही मोठे नुकसान झाले. या तरुणीस संपूर्ण आर्थिक मदतीचे आश्वासन सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वाताई सामंत यांनी दिले आहे. त्यांच्या संवेदनशीलतेला आणि कृतीशील सहभागाला सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.
शासनाच्या मदतीकडे लक्ष
या दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून काय मदत मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांना अपेक्षा आहे की, शासनही याप्रकरणी तत्काळ निर्णय घेऊन आवश्यक आर्थिक मदत जाहीर करेल.

