(मुंबई)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित होते. मनसेच्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमपत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव उद्घाटक म्हणून जाहीर झाल्यापासूनच या कार्यक्रमाने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली होती.
राज आणि उद्धव ठाकरे जेव्हा-जेव्हा एका व्यासपीठावर येतात, तेव्हा राजकीय चर्चांना उधाण येतं. शुक्रवारी झालेल्या दीपोत्सवात दोघेही बंधू एकत्र उपस्थित राहिले, मात्र दोघांनीही कोणतेही राजकीय भाष्य टाळले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अवघ्या 43 सेकंदाच्या भाषणात केवळ दिवाळीच्या शुभेच्छांपुरतेच वक्तव्य केले, तर राज ठाकरेंनीही फक्त “दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” देत राजकारणाला बगल दिली.
संपूर्ण महाराष्ट्राने हे आगळे दृष्य पाहिले आणि डोळ्यातदेखील साठवले. हे दृष्य खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंबांच्या मनोमिलनाचे होते. इकडे शर्मिला ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केल्यावर जाऊबाईंची गळाभेट झाली तर आदित्य ठाकरे यांचं अमित ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले तेव्हा दोन्ही बंधू आणि सोबत शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरेही सहभागी झाल्या होत्या.
दोन्ही बंधूंच्या या भेटीचा सोहळा काही आगळा होता. उद्धव आणि राज ठाकरे यांचे चेहरे हसरे होते, त्यांच्या कुटुंबांमध्ये हास्यविनोद सुरू होते, दोन्ही बंधूंची मुलेही एकमेकांशी गप्पा मारत होते. हा दोन ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनाचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने जवळपास दोन दशकांनंतर याचि देही याचि डोळा पाहिला. हे दृष्य सर्वांनी डोळ्यात साठवले. कारण जे काही घडत होतं ते सारं अ’राज’कीय होतं.
उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. तेथे जवळपास अर्धा तास दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर ठाकरे बंधूंनी नव्याने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याची पाहणी देखील केली.

“ही खरी मराठी माणसाची दिवाळी” — उद्धव ठाकरे
उद्घाटनानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मला खात्री आहे की, यंदाची दिवाळी खास आहे, कारण आज मराठी माणूस एकत्र आला आहे. या प्रकाशोत्सवाचा तेज प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. सर्वांनी आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि इतरांनाही आनंद देत राहा.”
दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या या संयुक्त उपस्थितीमुळे यंदाची दिवाळी ‘ठाकरे बंधूंची दिवाळी’ म्हणून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

