(चिपळूण / मांडकी-पालवण)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माजी विद्यार्थी मार्गदर्शन व संवाद’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअर, कृषी उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमात चार विद्यार्थ्यांची थेट कृषी उद्योग संलग्नक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमात ओलाम ॲग्रीचे संचालक विक्रम शिंदे, रॅबिट इंडियाचे संचालक केदार भोसले आणि भारती ग्रीन टेकचे संस्थापक विनय पोळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, व्यावसायिक प्रवासातील अनुभव आणि यशाची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली.
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. कृषी क्षेत्रातील आधुनिक संधी ओळखून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. “कृषीचे विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी त्यांचे नाव आणि नाते कायम मातीशी जोडलेले असावे,” अशी प्रेरणादायी भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारती ग्रीन टेकचे संस्थापक विनय पोळ यांनी महाविद्यालयातील चार होतकरू विद्यार्थ्यांची ‘कृषी उद्योग संलग्नक प्रशिक्षणासाठी’ निवड जाहीर केली. यामध्ये अथर्व पाचोरे, सिद्धेश्वर गळवे, ओम देवकर आणि अथर्व भुजबळ या विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांना प्रत्यक्ष उद्योगातील व्यावहारिक प्रशिक्षण देऊन भविष्यात रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

