(मुंबई)
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत एक वेगळं आणि लक्षवेधी चित्र समोर आलं आहे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरू असतानाच, यावेळी पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
879 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 821 पुरुष तर 879 महिला उमेदवार आहेत. एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे मोठ्या संख्येनं महिला उमेदवार मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.
कोणत्या भागात महिला उमेदवारांची संख्या जास्त?
देवनार, मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी या परिसरात सर्वाधिक म्हणजे 68 महिला उमेदवार आहेत. तर वरळी आणि प्रभादेवी परिसरात महिला उमेदवारांची संख्या सर्वात कमी असून ती 34 आहे.
प्रभागनिहाय महिला उमेदवारांची संख्या:
देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी – 68
वडाळा, दादर, शीव – 66
धारावी, महिम, दादर परिसर – 59
अंधेरी पूर्व – 56
घाटकोपर – 51
भायखळा, चिंचपोकळी, रे रोड – 50
अंधेरी पश्चिम – 46
भांडुप – 45
मालाड – 42
मुलुंड – 37
कुर्ला – 35
वरळी, प्रभादेवी – 34
नवीन आरक्षणाचा दिग्गजांना फटका
मुंबई महापालिकेची मागील निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर गेली साडेतीन वर्षे निवडणूक झाली नव्हती. यंदा नव्यानं राबवण्यात आलेल्या आरक्षण पद्धतीमुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. काही वॉर्डांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
माटुंगा, शीव आणि वडाळा परिसरातील प्रभागांमध्ये 10 पैकी 8 उमेदवार महिला आहेत. तर अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले पूर्व प्रभागांमध्ये 15 पैकी 11 नगरसेवक महिला असतील. बोरिवलीतील ‘आर मध्य’ प्रभागातही 10 पैकी 8 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 453 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये 220 पुरुष आणि 223 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांचा महिलांवर भर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपानं जाहीर केलेल्या 137 उमेदवारांपैकी 76 महिला तर 61 पुरुष आहेत. भाजपासाठी हे आतापर्यंतचं सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व मानलं जात आहे. आरक्षित जागांसोबतच खुल्या प्रभागांमध्येही महिलांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेनंही 91 जागांपैकी 63 जागांवर महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2017 आकडेवारी:
एकूण उमेदवार: 2,275
पुरुष उमेदवार: 1,190
महिला उमेदवार: 1,084
2017 मध्ये महिलांचा उमेदवारीतील वाटा सुमारे 47.6 टक्के होता. 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत हा टक्का आणखी वाढलेला स्पष्टपणे दिसत आहे.

