(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महसूल प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत असलेली निवे बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील तलाठी कार्यालयाची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण, मोडकळीस आलेली आणि धोकादायक अवस्थेत उभी आहे. इमारतीची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, प्रत्येक पावसाळ्यात टेरेसमधून मोठ्या प्रमाणात पाणी थेट कार्यालयात झिरपत असून, महत्त्वाचे शासकीय दप्तर, नोंदी आणि कागदपत्रे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे या इमारतीत रोज काम करणारे अधिकारी-कर्मचारी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून, छताची अवस्था दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी भीषण बनत असून, कोणत्याही क्षणी इमारतीचा काही भाग कोसळण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. तरीही संबंधित महसूल प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षाचे धोरण स्वीकारण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संभाव्य जीवितहानी टाळायची असेल तर या इमारतीची तातडीने तांत्रिक पाहणी करून ती धोकादायक घोषित करावी आणि तलाठी कार्यालयाचे कामकाज त्वरित सुरक्षित पर्यायी इमारतीत स्थलांतरित करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
याचबरोबर, निवे बुद्रुक येथे सर्व आधुनिक सुविधा असलेली नवीन तलाठी कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिकांच्या जीवाशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने आणखी दुर्लक्ष केल्यास भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची नैतिक जबाबदारी संबंधित यंत्रणेलाच स्वीकारावी लागेल, अशी तीव्र भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

