(जैतापूर / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण, रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने जून २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांत राबविण्यात आलेल्या ‘नागरी संरक्षण क्षमता बांधणी व विकास (Civil Defence Capacity Building)’ प्रशिक्षण उपक्रमाची यशस्वी सांगता झाली. या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रांतील तब्बल ३६० स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रशस्तीपत्र वितरण सोहळा १६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard), रत्नागिरीचे कमांडंट शैलेश गुप्ता तसेच २ नेव्हल एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर रामानुजन दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, चक्रीवादळे, आग, अपघात तसेच युद्धजन्य परिस्थितीसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी प्रशिक्षित नागरी संरक्षण स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. शासन यंत्रणा मदतीसाठी तत्पर असली, तरी स्थानिक स्तरावर प्रशिक्षित स्वयंसेवकांची तात्काळ मदत अनेकांचे प्राण वाचविण्यास आणि आपत्तीचे परिणाम कमी करण्यास उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले.
लेफ्टनंट कर्नल प्रशांत आर. चतुर (नि.), उपनियंत्रक, नागरी संरक्षण, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रशिक्षणात प्रथमोपचार, अग्निशमन, शोध व बचाव (Search and Rescue), विमोचन कार्य, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षित स्थलांतर, आपत्कालीन प्रतिसाद, समन्वय आणि स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्यांबाबत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले.
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वयंसेवकांना प्रशिक्षित करणे ही काळाची गरज असून, या उपक्रमामुळे प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम स्वयंसेवकांचे जाळे निर्माण होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व ३६० स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच अधिकाधिक युवक-युवतींनी नागरी संरक्षण दलात सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावे, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतः सज्ज व्हावे आणि समाजात जनजागृती करावी, असे आवाहन प्रमुख पाहुणे आणि अधिकाऱ्यांनी केले.
हा प्रशिक्षण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स, प्रशिक्षक, नागरी संरक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजन, समन्वय व प्रत्यक्ष प्रशिक्षणात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची भक्कम फळी तयार झाली असून, भविष्यात अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार अधिक व्यापक स्तरावर करण्याचा मानस नागरी संरक्षण, रत्नागिरी कार्यालयाने व्यक्त केला.

