(मुंबई)
कोकण विकास समितीने एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात महामार्गावर अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाख रुपयांचा विमा आणि मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा शासनाने द्यावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
तसेच, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता, प्रत्येक फेरीला गाडीच्या नुकसान भरपाईसाठी ठराविक रक्कम द्यावी, अशीही मागणी समितीने केली आहे. हे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील १८ वर्षांपासून अपूर्ण असून, आजही पळस्पे–इंदापूर, चिपळूण–आरवली–संगमेश्वर–हातखंबा या पट्ट्यांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विविध ठिकाणच्या अपूर्ण कामांमुळे वाहतूक खोळंबते, अपघात होतात आणि प्रवाशांचा वेळ व इंधनाचा मोठा अपव्यय होतो. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची स्थिती तर गंभीर असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो.
या रस्त्यांवरील खराब परिस्थितीमुळे गाड्यांचे टायर फुटणे, तांत्रिक बिघाड होणे आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन दुरुस्तीवर मोठा खर्च ओढवतो. याशिवाय गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला असून, अनेकजण अपंगत्वाला सामोरे गेले आहेत.
समृद्धी महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासारख्या रस्त्यांवर प्रवाशांकडून टोल आकारण्यात येतो. परंतु, कोकणातील या अपूर्ण व धोकादायक महामार्गावर प्रवाशांना विमा कवचच मिळत नाही. म्हणून शासनाने जबाबदारी स्वीकारून प्रवाशांना विमा संरक्षण आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

