(सातारा)
फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर भावूक झाले आणि अक्षरशः ढसाढसा रडताना दिसले. त्यांच्या समर्थक महिला कार्यकर्त्यांनी त्यावेळी त्यांचे पाय धुतले, दृष्ट काढली आणि दुग्धाभिषेक केला. या प्रसंगाने उपस्थित वातावरण भावनिक झाले होते.
मी नार्को टेस्टसाठी तयार आहे
“मी तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्या सर्वांनीही नार्को टेस्टला सामोरे जावे. मी त्यासाठीचा सर्व खर्च करायला तयार आहे,” असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले. त्यांनी मंचावरून सुषमा अंधारे, मेहबूब शेख आणि विरोधी नेतेमंडळींना थेट आव्हान दिले, “मी रणजितसिंह नाईक-निंबाळकर नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीदेखील सोशल मीडियावर जाहीर करावे की ते तयार आहेत.” पत्रकार परिषदेदरम्यान रणजितसिंह यांनी आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांवर “राजकीय मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून माझी बदनामी केली जात आहे”, असा आरोप केला. त्यांनी थेट रामराजे नाईक-निंबाळकरांवर निशाणा साधत “माझी बदनामी करणारे हेच मास्टरमाईंड आहेत,” असा दावा केला. “मला गोळी घातली असती तरी चाललं असतं, पण एवढी बदनामी का करता?” असा भावनिक सवाल करत त्यांना रडू कोसळले.
“सुषमा ताईंचा यात दोष नाही. त्यांना मास्टरमाईंडकडून चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी ती खरी वाटली आणि त्यांनी तशीच घेतली. पत्रकारांनीही माझं मत मांडलं नाही” असेही रणजितसिंह म्हणाले.
पत्रकार परिषदेत दाखवला पुरावा
नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्क्रीन लावून आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी दाखवलेल्या पत्रात “पेट्रोल चोरीच्या गुन्ह्याचा” उल्लेख असल्याचा दावा त्यांनी फेटाळला. त्याचबरोबर, सुषमा अंधारे यांनी दाखवलेल्या 2017 च्या कथित व्हिडिओत “RR Nimbalkar” नावाने दिसलेले नोटिफिकेशन त्यांनी अचूक दाखवून आपली बाजू स्पष्ट केली. पत्रकार परिषदेनंतर समर्थकांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा दुग्धाभिषेक करत त्यांना आशीर्वाद आणि पाठिंबा दिला. त्यावेळी रणजितसिंह पुन्हा भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

