(बदलापूर / ठाणे)
एका क्षुल्लक मेसेजमुळे निर्माण झालेल्या रागातून बदलापूर शहरात एका डॉक्टर महिलेवर तिच्या पतीने केलेल्या क्रूर हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. किरण शिंदे (अंबरनाथ पश्चिम, मोहन सबर्बिया गृहसंकुल) यांच्या डोक्यावर पती विश्वंभर शिंदे यांनी लोखंडी खलबत्त्याने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत डॉक्टर किरण यांचा जीव थोडक्यात वाचला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शाळेतील एका बालमित्राने माथेरान भेटीदरम्यान घेतलेल्या आणि DPवर ठेवलेल्या त्या फोटोवर “नाईस डीपी” असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज पाहून पती विश्वंभर यांच्या मनात संशय आणि ईर्ष्या निर्माण झाली.
या घटनेबाबत बोलताना डॉ. किरण शिंदे यांनी पुढे सांगितले की, सकाळी चार-साडेचारला मी उठले आणि गायनाचा सराव करायला बसले. मी मुलगा झोपला होता त्या रूमध्ये होते. मी पतीला विचारले की चहा घेणार का? याच्या एक दिवस आधी आम्ही माथेरानला गेलो होतो. माझ्या एका शालेय मित्राने मला “नाईस डीपी” असा मेसेज पाठवला होता. पतीला या गोष्टीचा राग आला होता. माझ्या मागून येऊन त्याने किचनमध्ये येऊन खलबत्ता घेऊन मला मारहाण केली, मला ढकललं, माझा गळा दाबला. माझ्या ओरडण्यामुळे मुलाने धावत येऊन मला वाचवलं.
मुलाच्या मदतीमुळे डॉक्टर किरण यांचा जीव वाचला. हल्ल्यानंतर पतीनेच त्यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारानंतर डोक्यावर अनेक टाके पडले आहेत. यापूर्वीही छोट्या-छोट्या कारणांवरून पतीने मारहाण केल्याचं डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं. “माझा जीव नक्कीच जाऊ शकला असता. माझ्या पतिविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि त्याला अटक करावी,” अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
बदलापूर पोलिसांनी विश्वंभर शिंदे यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे बदलापूर शहरात संतापाचे वातावरण आहे. महिलांवर घरातच असा हल्ला झाल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, “ईर्ष्या आणि अविश्वास यांमुळे होणारे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार समाजासाठी धोक्याचा इशारा आहेत. भावनिक नियंत्रण आणि महिलांविषयी आदर शिकणं ही काळाची गरज आहे.”

