(मुंबई)
राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या दिला जाणारा निर्वाह भत्ता 15 हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली. ही बाब सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यान समोर आली. चर्चेत सदाभाऊ खोत यांनीही सहभाग घेतला.
50 हजारांपर्यंत भत्ता वाढीचा प्रस्ताव
मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 7.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना सध्या भत्त्याचा लाभ दिला जात असून काही शाळांमध्ये वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित आहेत.
भत्ता वाढीबाबत संबंधित संस्थांसोबत बैठक घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त सहभाग असलेल्या योजनांमध्ये निधी वितरणात तांत्रिक अडचणी येत आहेत. केंद्राचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने तो कधी कधी अन्य कारणांसाठी वापरला जातो याबाबत केंद्राशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निधी थेट महाविद्यालयांना देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. ठोस निर्णय आणि निधी वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. तसेच, निधी उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे निकाल किंवा कागदपत्रे अडवू नयेत, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठे आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता असून, शैक्षणिक सुविधांमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

