(रत्नागिरी / वार्ताहर)
ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि भक्कम आर्थिक शिस्त यांच्या बळावर कार्यरत असलेल्या स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘ठेववृद्धी मासा’ला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २० जून ते २० जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमादरम्यान संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये तब्बल ३४ कोटी १९ लाख रुपयांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. याच कालावधीत २,२२५ खात्यांमध्ये नव्या ठेवी जमा झाल्या, तर २६९ नवीन ठेवीदार संस्थेशी जोडले गेले.
ठेववृद्धी मासाच्या प्रारंभी संस्थेच्या एकूण ठेवी ४१४ कोटी रुपये होत्या. अवघ्या एका महिन्यात त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन २० जुलैअखेर ठेवींचा आकडा ४४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये या अभियानाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आता पतसंस्था ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.
संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण ग्राहक सेवा यामुळे ठेवीदारांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. संस्थेने ९९.७८ टक्के कर्जवसुली, शून्य टक्के एनपीए, २७ टक्के सीआरएआर (CRAR), २०० कोटी रुपयांची बँक गुंतवणूक आणि ३०७ कोटी रुपयांचे कर्जवाटप अशी भक्कम आर्थिक कामगिरी कायम राखली आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले, “ठेववृद्धी मासाला मिळालेला प्रतिसाद हा सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांनी स्वरूपानंद पतसंस्थेवर दाखविलेल्या दृढ विश्वासाची पावती आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि दर्जेदार ग्राहक सेवेमुळे हा विश्वास अधिक बळकट होत आहे. ठेवीदारांच्या विश्वासाचे जतन करणे आणि सुरक्षित, विश्वासार्ह सेवा देणे हेच संस्थेचे सर्वोच्च ध्येय असून, ग्राहकांच्या सहकार्याच्या बळावर ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा लवकरच गाठू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरवर्षी २० जून ते २० जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणारा ‘ठेववृद्धी मास’ हा स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आणि ग्राहकांशी असलेल्या विश्वासाच्या नात्याचा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. यंदा मिळालेल्या विक्रमी प्रतिसादामुळे संस्थेच्या आगामी वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल अधिक वेगाने सुरू झाली आहे.

