(दिल्ली)
जून महिना संपला असून, आजपासून म्हणजे १ जुलैपासून नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीची सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून काही महत्त्वाचे बदल लागू केले जातात. यंदा १ जुलैपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते बँकिंग आणि रेल्वे नियमांमध्ये बदल होणार आहेत, जे थेट नागरिकांच्या घरगुती बजेटवर आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करतील. चला जाणून घेऊया हे 10 महत्त्वाचे बदल:
1. एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये संभाव्य बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल केले जातात. गेल्या जूनमध्ये व्यावसायिक १९ किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये ₹२४ पर्यंत कपात करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे यंदा १ जुलैपासून त्यांच्या किमतींमध्ये वाढ किंवा कपात होण्याची शक्यता आहे.
2. HDFC क्रेडिट कार्ड वापर महागणार
एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करत १ जुलैपासून नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार युटिलिटी बिल भरण्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. Paytm, Mobikwik, FreeCharge किंवा Ola Money सारख्या डिजिटल वॉलेट्समध्ये महिन्याला ₹१०,००० पेक्षा जास्त रक्कम टाकल्यास १% शुल्क आकारले जाईल.
3. ICICI बँक ATM व IMPS व्यवहारांचे नवीन शुल्क
१ जुलैपासून ICICI बँकेच्या ATM वापरावर आणि IMPS व्यवहारांवर नवीन शुल्क लागू होणार आहे:
-
ATM शुल्क: मेट्रो शहरांमध्ये पाचवेळा आणि नॉन-मेट्रोमध्ये तीन वेळा पैसे काढल्यानंतर प्रत्येकी ₹२३ शुल्क आकारले जाईल.
-
IMPS ट्रान्सफर:
-
₹१,००० पर्यंत: ₹२.५०
-
₹१,००१ ते ₹१,००,०००: ₹५
-
₹१ लाख ते ₹५ लाख: ₹१५
-
4. रेल्वे भाडेवाढ आणि तात्काळ तिकीट बुकिंगचे नवे नियम
भारतीय रेल्वेकडूनही १ जुलैपासून महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत:
-
भाडेवाढ:
-
नॉन-एसी मेल/एक्सप्रेस: ₹०.०१ प्रति किलोमीटर
-
एसी गाड्यांसाठी: ₹०.०२ प्रति किलोमीटर
-
५०० किमीपर्यंत सेकंड क्लास तिकीट आणि मासिक पासमध्ये कोणताही बदल नाही.
-
-
तात्काळ तिकीट बुकिंग:
-
केवळ आधार पडताळणी केलेले IRCTC वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील.
-
5. पॅन कार्डसाठी आधार पडताळणी अनिवार्य
१ जुलैपासून नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्डची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी इतर कागदपत्रांचा आधार घेतला जात होता, परंतु सीबीडीटीच्या नवीन नियमांनुसार आधारशिवाय पॅन कार्ड अर्ज मंजूर केला जाणार नाही.
6. दिल्लीमध्ये जुन्या वाहनाना इंधन नाही
दिल्ली सरकार आणि Commission for Air Quality Management (CAQM) च्या निर्णयानुसार, १ जुलैपासून “End-of-Life Vehicles” (EOL) म्हणजेच:
-
१० वर्षांहून जुनी डिझेल वाहने
-
१५ वर्षांहून जुनी पेट्रोल वाहने
यांना शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपावरून इंधन दिले जाणार नाही. हा निर्णय वायू प्रदूषण रोखण्यासाठी घेण्यात आला आहे.
7. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत वाढवली
करदात्यांना दिलासा देत, CBDT ने आर्थिक वर्ष 2024-2025 (Assesment Year 2025-2026) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. रिटर्न फाइल करण्यासाठीची मुदत 31 जुलैऐवजी 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे.
8. रेल्वे वेटलिस्ट चार्ट सुटण्यापूर्वी 8 तास आधी तयार होणार
सध्या, ट्रेन सुटण्यापूर्वी चार तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जातो, ज्यामुळे वेटींग लिस्टवरील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कमी वेळ मिळतो. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने 8 तास आधी चार्ट तयार करण्याचे निश्चित केले आहे.
9. कॉल मनी मार्केटच्या वेळेत वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरबँक कॉल मनी मार्केटच्या कामकाजाची वेळ 1 जुलैपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होती. यामुळे बँकांना पैसे उधार देणे आणि घेणे यासाठी 2 तास अतिरिक्त मिळणार आहेत.
10. GSTR-3B रिटर्न मध्ये बदल करता येणार नाही
जुलैपासून GSTR-3B रिटर्न एकदा भरल्यानंतर ‘लॉक’ होईल हे रिटर्न GSTR-1/1A डेटा वापरून आपोआप भरले जातील आणि सबमिशननंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
१ जुलै २०२५ पासून लागू होणारे हे नियम प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणार आहेत. त्यामुळे वेळेत योजना आखणे आणि आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे ठरेल. स्वयंपाकघरातील खर्चापासून ते तुमच्या डिजिटल व्यवहारांपर्यंत, हे बदल लक्षात घेऊनच पुढील आर्थिक नियोजन करा.