(चिपळूण)
जिजाऊ ब्रिगेड संघटना आणि अपरांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक व घसा तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, पिंपळी खुर्द येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर जिजाऊ वंदनेने सभेला सुरुवात झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुकाध्यक्ष मिलन गुरव यांनी केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुंदा मोरे, डॉ. रजनीश रेडीज, संध्या साळुखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आरोग्य जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तत्पूर्वी, शिबिराच्या कार्यवाहीस औपचारिक प्रारंभ करण्यात आला. शिबिरासाठी डॉ. रजनीश रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक व घसा तपासणी करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रसंगी माजी कोकण-मुंबई कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव, तालुका सचिव पुर्वाताई आयरे, प्रभाताई शिंदे, मेडिकल हेड गीता बामणे, जनसंपर्क अधिकारी संध्या साळुखे, तसेच राजेश गमरे, सोनाली चव्हाण, विद्या जालवणकर, संचयता चिपळूणकर, दर्शना प्रजापती, निलेश बेचावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तसेच शाळेतील शिक्षकवर्गाने विशेष मेहनत घेतली.