(मालवण)
राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत सुबक, आकर्षक आणि देखणा असून, भविष्यात “खरा शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा?” याचे उदाहरण द्यावे लागले, तर तो मालवणमधील या पुतळ्याचेच असावे, असे गौरवोद्गार खासदार नारायण राणे यांनी काढले.
मेढा-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याची खासदार नारायण राणे, राज्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले, “ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा पुतळा साकारण्यात आला असून, त्यांनी हे काम अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडले आहे. यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. या संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी संयुक्तपणे काम करत असून, आज श्री. सुतार यांची झालेली भेट मालवणची शोभा वाढविण्यासाठी अतिशय योग्य ठरणार आहे”, असेही श्री राणे यांनी स्पष्ट केले.
या पुतळ्याचे पूजन ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली. पुतळ्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुतळ्याभोवती समुद्र दृश्य स्पष्ट दिसावे यासाठी किल्ल्याच्या भिंतींची उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, समुद्रातून थेट पुतळ्याजवळ येण्यासाठी नौकांसाठी एक छोटा जेट्टी बांधण्याची योजना आहे. परिसराचे लँडस्केपिंगही भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.