(मुंबई / रामदास धो. गमरे)
“गिरणी कामगारांच्या प्रश्नांकरता अण्णाभाऊ साठे आणि मोरे हे निवेदन घेऊन राजगृहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले असता नेहमीप्रमाणे बाबासाहेब लिखाण करीत बसले होते काहीवेळांने त्यांचे लक्ष प्रतीक्षा करीत असलेल्या साठे आणि मोरेंकडे गेले आणि बाबासाहेबांनी त्यांना नजरेनेच सूचना करीत बसण्यास सांगितले तेव्हा ते खुर्चीवर स्थानापन्न झाले. त्यांनी लिखित निवेदनपत्र बाबासाहेबांच्या हाती सुपूर्द केले, निवेदन वाचून बाबासाहेबांनी त्यांना तिथेच गिरणी कामगारांच्या सर्वच प्रश्नांना मंजुरी देण्याचा शब्द देत कायदेशीर प्रक्रियेसाठी निवेदन पुढे पाठवून दिले, त्यावेळी मोरे यांनी अण्णाभाऊंची ओळख करून देताना बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब हे अण्णाभाऊ साठे, त्यावेळी बाबासाहेब हसून म्हटले मी त्यांचं लिखाण वाचलं आहे त्यांचं लिखाण माझ्या परिचयाचे असून हे नुसते अण्णाभाऊ नाहीत तर ते खऱ्या अर्थाने “लोकशाहीर” आहेत व त्यावेळीच त्यांना बाबासाहेबांनी अण्णाभाऊना “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” या उपधीने अलंकृत केले” असे प्रतिपादन प्रबुद्ध साठे यांनी अण्णाभाऊ साठे नगर शिवडी येथे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित भीम महोत्सव – २०२५ या कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना केले.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८, माता रमाई महिला मंडळ, पंचशील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीम महोत्सव – २०२५ शाखाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या अधिपत्याखाली अण्णाभाऊ साठे नगर, गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी १३ एप्रिल २०२५ रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला, पहिल्या सत्रात मुलांकरता धावण्याची स्पर्धा तर दुसऱ्या सत्रात मुलांकरता चित्रकला स्पर्धा तर रात्री तिसऱ्या सत्रात मुलांचा नृत्य कलाविष्कार स्पर्धा हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले, धावण्याच्या स्पर्धेचे परीक्षक हर्ष सिंग तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षक विशाल गमरे, नितेश मोरे, सागर मोहिते तर नृत्य कलाविष्कार स्पर्धेचे परीक्षक विशाल कांबळे होते सर्व परीक्षकांनी पारदर्शक पद्धतीने परीक्षण केले, मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दि. १४ एप्रिल २०२५ रोजी जैतवन बुद्ध विहार याठिकाणी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली तद्नंतर योगिता उल्हास मोरे, अनंत गोविंद मोहिते, राजाभाऊ तथा रामदास धोंडू गमरे यांनी धार्मिक पूजापाठ सुमधुर वाणीने पार पाडला, त्यानंतर अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले, सर्व वसाहतीमधील नागरिकांना वैद्यकीय तपासणी साठी मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले सदर शिबीराचे उद्घाटन माजी कार्यसम्राट नगरसेवक सुनील मोरे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक वंजारी साहेब, मुंबई अध्यक्ष संदीप मोहिते या तिघांच्या शुभहस्ते करण्यात आले सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत अनेक रहिवाश्यांनी आवर्जून हजेरी लावून सदर शिबिराचा लाभ घेतला, शिवडी गटक्रमांक १३ च्या वतीने निघणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीत सर्वांनी सहभागी होऊन मिरवणुकीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले त्या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्यदिव्य संविधान प्रतिकृती बनवली होती त्याचे उद्घाटन माजी नगरसेवक सुनील मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दि. १५ एप्रिल २०२५ रोजी महिलांसाठी पैठणीचा खेळ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण खेळांच्या बक्षीस वितरण व प्रमुख वक्ते प्रबुद्ध साठे यांच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यान सुरू असताना कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब आले त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या व्याख्यानात प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले की “मातंग, चर्मकार आणि बौद्ध हे तीन भाऊ एकत्र आले आणि एक समाज निर्माण झाला तर विकासाची कवाडे आपोआप खुली होतील आणि बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने गतिमान करण्यासाठी आपला हातभार लागेल, बाबासाहेबांनी मातंग समाजसाठी अनेक परिषदा घेतल्या आणि अण्णाभाऊंनी ही बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरू मानून त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या लेखणीतून त्यांनी बाबासाहेब व बाबासाहेबांचे विचार मांडले, त्यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी ही त्यांनी बाबासाहेबांना समर्पित केली आहे, आज बाबासाहेबांना अनुसरून बौद्ध समाज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे, मातंग समाज आजही अंधश्रद्धा रूढी-परंपरा यात अडकलेला आहे म्हणून अण्णाभाऊंचा आदर्श घेत जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून समाज चालला तर जास्तीत जास्त लेखक, विचारवंत समाजातून घडू शकतात” असे विचार व्यक्त केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे गटक्रमांक १३ चे व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे सरचिटणीस मोहिते, मातंग युवा संघटनेचे शिंदे, लोकरे, बाळ अडसूळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जाधव व उपेंद्र लोखंडे यांनी केले. तर प्रस्ताविक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सादर केले. सदर प्रसंगी विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चार दिवसीय भीम महोत्सव – २०२५ भूतो न भविष्यती असा संपन्न झाला, सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंचशील मंडळाच्या तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ यांनी तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून सरचिटणीस अनंत मोहिते यांनी भीम महोत्सव – २०२५ या चार दिवसीय कार्यक्रमाची सांगता केली.