(कोल्हापूर)
शिवसेना (ठाकरे गट) चे नवनियुक्त शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी सोमवारी संध्याकाळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील ‘मुक्तगिरी’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्याचे आयोजन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, “मी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होतो. पण मला शहरप्रमुखपद देण्यात आले. तरीही मी नाराजी व्यक्त करत केवळ खंत मांडली. मात्र, आदित्य ठाकरेंनी दिलेलं उत्तर जिव्हारी लागलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं – निर्णय मान्य नसेल तर निघून जा. त्यामुळे मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या आणि सदस्यत्वाचा त्याग करत आहे.”
हर्षल सुर्वे हे गेली २५ वर्षे शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख, रायगड जिल्हा विस्तारक, कोल्हापूर जिल्हा विस्तारक, तसेच शहर समन्वयक अशा विविध पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. नुकतीच त्यांची ठाकरे गटात कोल्हापूर दक्षिणचे शहरप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्यामुळे सुर्वे नाराज होते. त्यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी आपली इच्छाशक्ती व्यक्त केली होती, परंतु त्यांना अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी, “शिवसेनेचा निर्णय मान्य करून काम करा,” असा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर हर्षल सुर्वे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि सोमवारी थेट मुंबई गाठत शिंदे गटात प्रवेश केला.
संजय पवार यांचा राजीनामा : कार्यकर्त्यांचा विरोध

संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना सांगितले, “यापुढे मी केवळ सक्रिय कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.” मात्र, त्यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध झाला. “राजीनामा मंजूर नाही!” अशा घोषणांनी पत्रकार परिषद गाजली. पक्षाकडून नुकतीच माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे पक्षात नाराजीचे वारे वाहू लागले असून, याच नियुक्तीचा निषेध म्हणून संजय पवार यांनी राजीनामा दिल्याचे समजते.
संजय पवार यांनी स्पष्ट केलं की, “नवीन जिल्हाध्यक्षांविषयी आम्हाला वैयक्तिक नाराजी नाही. मात्र, ही नेमणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती. इच्छुक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असती, तर आजचा उद्रेक टाळता आला असता. आम्ही उद्धव साहेबांचा निर्णय मानतो, पण प्रक्रिया चुकीची वाटली.” विधानसभा निवडणूकीपासून जिल्हाप्रमुख नेमणूकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो तरी गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रध्दा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या नाट्यमय घडामोडींमुळे कोल्हापुरातील शिवसेना (उबाठा) गटाची संघटनात्मक गणिते ढवळून निघण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतात. संजय पवार व हर्षल सुर्वे हे दोघेही कोल्हापुरातील प्रभावशाली नेतृत्व मानले जाते, त्यामुळे त्यांचा पक्षातून बाहेर पडणे ही शिवसेना (उबाठा) साठी मोठा धक्का ठरू शकतो.

