( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, मानवी वस्तीत या वन्यप्राण्याच्या उपस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ब्राह्मणवाडी परिसरातील गजबजलेल्या भागात बिबट्या दिसल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मैत्री संकुल सोसायटीमध्ये राहणारे श्रद्धा हॉटेलचे उद्योजक प्रभाकर घाणेकर यांच्या पाळीव मांजरीचा अचानक तपास लागेनासा झाल्याने त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये रात्रीच्या सुमारास घराशेजारी बसलेल्या मांजरावर बिबट्याने झडप घातल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नंतर बिबट्या मांजराला उचलून जंगलात घेऊन गेला. धामणी परिसर हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असून, येथे हॉटेल्स, पेट्रोल पंप व सततची वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही बिबट्या मोकळेपणाने वावरत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले, वृद्ध आणि महिलांसाठी धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. या घटनेची दखल घेऊन वनखात्याने तात्काळ उपाययोजना कराव्यात, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी प्रभाकर घाणेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.