(देवरूख)
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. श्लोका मेघा सागर संकपाळ हिला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी चतुरंग प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे शाळेच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा पुरस्कार नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या समारंभात (नि.) मेजर जनरल शिशिर महाजन आणि राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा मानला जातो. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
कु. श्लोका संकपाळ हिची निवड केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित नसून तिची सातत्यपूर्ण अभ्यासातील कामगिरी, शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग, विविध स्पर्धांमधील यश आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून करण्यात आली आहे. श्लोका ही अभ्यासू, शिस्तप्रिय आणि विनम्र स्वभावाची विद्यार्थिनी म्हणून परिचित आहे.
तिच्या घडणीत शाळा समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, मुख्याध्यापिका सोनाली नारकर, वर्गशिक्षिका भाग्यश्री तांदळे, दीक्षा खंडागळे तसेच शिक्षक मंगेश जाधव, अर्चना मांगले, पूर्वा चव्हाण, कला शिक्षक सूरज मोहिते, शर्वरी गोपाळ, तेजश्री आठवले, क्रीडाशिक्षक प्रतीक कीर्वे व सागर पवार आणि इतर शिक्षकवृंदांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
श्लोकाचे पालक डॉ. सागर संकपाळ व सौ. मेघा संकपाळ हे दोघेही शिक्षक असून त्यांनी तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातील प्रशालेत शिक्षण घेण्याचा तिला लाभ झाला आहे. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत हे तिचे आदर्श असून विद्यार्थ्यांना राष्ट्रहितासाठी कार्य करण्यास ते नेहमी प्रोत्साहित करतात.
प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदनपर कार्यक्रमात कु. श्लोका संकपाळ हिने पुरस्कारातून मिळालेली रोख रक्कम संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्याकडे सुपूर्द केली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, पालक आणि शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

