(लांजा / वार्ताहर )
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या आणि ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांजा तालुक्यातील माचाळ गावाचा एसटी बससेवेचा प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ अखेर संपला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी रविवारी (१ नोव्हेंबर) पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची लालपरी गावात दाखल झाली. गावात पहिली एसटी पोहोचताच ग्रामस्थांनी दिवाळीसारखा उत्सव साजरा केला. महिलांनी आरती आणि औक्षण करून बसचे स्वागत केले, तर तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडत आनंद व्यक्त केला. आयुष्यभर डोंगरवाटांची पायपीट केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू तरळले.
समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर असलेले माचाळ गाव निसर्गसौंदर्य आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक असलेल्या या गावाला स्वातंत्र्यानंतरही नियमित वाहतूक सुविधेपासून वंचित राहावे लागले होते. गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना डोंगर-दऱ्या आणि अवघड पायवाटा पार करत तासन् तास प्रवास करावा लागत होता.
या दुर्गम परिस्थितीचा सर्वाधिक फटका रुग्ण, गरोदर महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत होता. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा गरोदर मातेला प्रसूतीसाठी रुग्णालयात न्यायचे असल्यास डोली अथवा झोळीचा आधार घेऊन डोंगर उतरावा लागत होता. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दररोजच्या प्रवासासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. ही समस्या दूर व्हावी आणि गावाला रस्ता व एसटी सेवा मिळावी, यासाठी माचाळ पर्यटन संस्थेचे विवेक सावंत आणि ग्रामस्थ अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत होते.
स्थानिक आमदार किरण सामंत, पंचायत समिती सदस्य उमेश पत्की आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी लांजा एसटी आगारातून माचाळसाठी पहिली बस मार्गस्थ झाली. केळवली आणि भोजवाडीमार्गे घाटातील वळणावळणाच्या नव्या रस्त्यावरून प्रवास करत ही लालपरी माचाळच्या वेशीवर पोहोचली. तब्बल ७८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावात एसटी दाखल होत असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात बसचे स्वागत करण्यात आले.
गावात बस दाखल झाल्यानंतर महिलांनी तिचे पूजन केले. एसटीचे चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी त्यांचे औक्षणही केले. त्यानंतर गावात पेढे वाटून हा ऐतिहासिक क्षण आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला.
नवीन एसटी बससेवेमुळे माचाळमधील शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीची मोठी अडचण दूर झाली आहे. याशिवाय, निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ‘मिनी महाबळेश्वर’ला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठीही आता थेट एसटी प्रवासाचा मार्ग खुला झाला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावात पोहोचलेल्या लालपरीमुळे माचाळच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडण्याची अपेक्षा आहे.


