(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुख शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कारवाई करत गजबजलेल्या परिसरातील सलग तीन बंद घरांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील वर्दळीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोरही सुरक्षेचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तीन घरे काही दिवसांपासून बंद होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. घरांतील कपाटे व इतर साहित्याची उलथापालथ करत त्यांनी मौल्यवान ऐवजावर हात साफ केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. तिन्ही घरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, चोरीला गेलेल्या रोकड, दागदागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे चोरीचा एकूण आकडा पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, नेहमीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी केवळ बंद घरांनाच लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
या सलग चोऱ्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याबरोबरच संशयास्पद हालचालींवर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून, चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

