(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथे काळजाचा थरकाप उडवणारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. रत्नागिरीच्या दिशेने आपल्या मारुती सुझुकी अल्टो के टेन (क्रमांक एम.एच. ०८ ए.यु. ५१००) या कारने जाणाऱ्या मंडणगड येथील ६६ वर्षीय प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय केशव लेंडे यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या एका बेदरकार टाटा ट्रकने (क्रमांक के. ए. २२ ए. ए. २९४७) इतकी भीषण धडक दिली. दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने उपस्थितांचा थरकाप उडाला.
संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार , ६६ वर्षांचे दत्तात्रय लेंडे हे त्यांच्या कारने निघाले होते. तळेकांटे गावच्या हद्दीत आले असता, विरुद्ध दिशेकडून काळ बनून आलेल्या टाटा ट्रकने त्यांच्या कारला चालकाच्या बाजूने प्रचंड वेगात धडक दिली. हा तडाखा इतका मोठा होता की, कार रस्त्यावरून अक्षरशः उडून डायव्हर्जनच्या पलीकडे फेकली गेली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दत्तात्रय लेंडे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे लेंडे कुटुंबावर चिंतेचे सावट पसरले असून महामार्गावरील अशा बेजबाबदार आणि राक्षसी वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांना त्रास होत आहे.
या मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर जखमीचे सुपुत्र दिनेश दत्तात्रय लेंडे यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागितली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी दि. ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १३.२८ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बेळगाव येथील ट्रक चालक हनुमंत लक्ष्मण हल्ली याच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल के. आर. सावंत यांनी या घटनेची नोंद केली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. जाधव या भीषण अपघाताचा सखोल तपास करत आहेत. दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

