( मुंबई / वृत्तसंस्था )
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा, लावणीचा ठेका आणि तमाशाच्या दुनियेतील कलाकारांचे संघर्षमय आयुष्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. ‘नटरंग’ या गाजलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक रवी जाधव आता ‘फुलवरा’ या नव्या चित्रपटातून लावणी आणि लोककलेच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाण्यास सज्ज झाले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील वेगळी दृश्यशैली आणि आशयपूर्ण मांडणीमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 14 जानेवारी 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फुलवरा’च्या टीझरमध्ये कलाकारांची ओळख किंवा त्यांचे चेहरे दाखवण्याऐवजी त्यांच्या कलेशी जोडलेला संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. घुंगरू बांधलेल्या पायांच्या हालचालींतून कलाकारांच्या आयुष्यातील वेगवेगळे अनुभव आणि त्यांच्या कलाप्रवासातील आव्हाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठे आनंदाने तालावर थिरकणारे पाय दिसतात, तर कुठे अडखळणारे आणि रक्ताने माखलेले पाय कलेसाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव करून देतात. देवीच्या चरणी फुलवरा अर्पण करणारे हात, ढोलकीवर थाप देणारी बोटे, तबल्याचे सूर आणि तालावर रंगणारे नृत्याविष्कार अशा दृश्यांतून चित्रपटाचे भावविश्व उलगडते. हर्ष-विजय यांच्या संगीताची जोड या दृश्यांचा प्रभाव अधिक ठळक करते.
‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ हा टीझरमधील संवाद चित्रपटाच्या आशयाचे महत्त्वाचे सूत्र ठरतो. लावणीच्या रंगमंचावर दिसणारा झगमगाट, कलाकारांची अदाकारी आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांमागे असलेले कष्ट, त्याग आणि वर्षानुवर्षांची साधना या एका ओळीतून व्यक्त होते. कलेप्रती निष्ठा राखताना कलाकारांना परिस्थितीशी झुंज द्यावी लागते, स्वतःच्या मर्यादांवर मात करावी लागते आणि आपल्या स्वप्नांसाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. याच प्रवासाची झलक ‘फुलवरा’च्या टीझरमधून पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट केवळ लावणीच्या सादरीकरणापुरता मर्यादित नसून, या लोककलेशी आयुष्यभर नाते जोडलेल्या कलाकारांच्या भावना, स्वप्ने आणि संघर्ष उलगडणारा असेल, असे संकेत मिळतात.
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले की, लावणी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर ठेका, रंगमंचावरील उत्साह आणि नृत्यांगनांची अदाकारी येते. मात्र, या आकर्षक सादरीकरणामागे कलाकारांची अनेक वर्षांची मेहनत आणि कलेविषयीची अपार निष्ठा दडलेली असते. हाच पडद्यामागचा संघर्ष टीझरमधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांत बांधलेले घुंगरू तसेच त्यांच्या पायांवरील रक्त आणि माती ही त्यांच्या कलाप्रवासातील विविध टप्प्यांची प्रतीके आहेत. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ हा विचार लावणीला आपले आयुष्य मानणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या भावविश्वाचे प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्राच्या लोककलेमागील जिद्द, प्रेम आणि समर्पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हा चित्रपटाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही या चित्रपटाच्या माध्यमातून लोककलेच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘फुलवरा’मध्ये लावणीचे मनोरंजक आणि आकर्षक सादरीकरण दाखवण्याबरोबरच या कलेसाठी कलाकारांना घ्यावी लागणारी मेहनत आणि त्यांचे कलेशी असलेले भावनिक नातेही मांडले जाणार आहे. घुंगरांचा नाद हा केवळ नृत्याचा ताल नसून कलाकारांच्या मनातील स्वप्नांचा आवाज आहे. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनातून हा भाव मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे व्यक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झी स्टुडिओजच्या माध्यमातून मराठी मातीशी आणि लोकपरंपरेशी नाते सांगणारी कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
‘फुलवरा’च्या संगीताची धुरा लोकसंगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या ‘द फोक आख्यान’ या समूहातील हर्ष-विजय या संगीतकार जोडीने सांभाळली आहे. या समूहाचे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. पारंपरिक लोकसंगीताचा मूळ गाभा कायम ठेवून त्याची सांगड आजच्या पिढीच्या आवडीशी घालण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
साधारण 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले होते. लावणी आणि तमाशाच्या परंपरेची नव्या पिढीला ओळख करून देतानाच मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देण्यात या चित्रपटाचे महत्त्वपूर्ण योगदान होते. आता त्याच लोककलेचा समृद्ध वारसा आणि त्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कलाकारांची कहाणी ‘फुलवरा’मधून मांडली जाणार आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे आणि कथानक अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी टीझरमधील दृश्ये, संगीत आणि संघर्षाची मांडणी यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘नटरंग’नंतर रवी जाधव यांचा हा नवा प्रयत्न लावणी आणि तमाशाच्या विश्वाची कोणती बाजू समोर आणणार, याकडे आता लक्ष लागले आहे.


