(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे मनवेवाडी येथे गुरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसामुळे गोठ्यात अडकलेल्या दोन मुक्या जनावरांचे प्राण वाचवण्यात यश आले.
ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोठा आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला.
आग लागली त्यावेळी गोठ्यात दोन जनावरे बांधलेली होती. ज्वाळांनी गोठ्याला वेढा घातल्याने ही मुक्या जीवांनी जीव वाचवण्यासाठी आक्रोश सुरू केला. धुराचे प्रचंड लोट आणि आगीची तीव्रता पाहता गोठ्याजवळ जाणेही धोकादायक होते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीच्या विळख्यात शिरून दोन्ही जनावरांना सुरक्षित बाहेर काढले. ग्रामस्थांच्या या साहसी कृतीमुळे मोठी जीवितहानी टळली.
आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी बोरवेल व उपलब्ध पाण्याचा वापर करत शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत शेतकरी चंद्रकांत भागोजी मनवे यांच्या गोठ्यातील साहित्य व बांधकाम जळून खाक झाले होते. या आगीत त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच असुर्डे गावचे सरपंच प्रदीप शिंदे, तलाठी अमर फटतरे, ग्रामसेवक कांबळे, कोतवाल संदेश शिंदे आणि वरिष्ठ लिपिक अजय पड्याळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मुक्या जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

