( तवसाळ / सचिन कुळये)
आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ, बाबरवाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने जलसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत साठा वाढवण्याच्या उद्देशाने ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सहभागातून श्रमदानाने बंधारा बांधण्याचे काम करण्यात येत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बाबरवाडीतील ग्रामस्थांनी वेळेत जलसंधारणाची उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग भविष्यात करता यावा, या उद्देशाने सर्वांनी एकत्र येत बंधारा बांधणीच्या कामात श्रमदान केले.
या उपक्रमात बाबरवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक जोशी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ग्रामस्थ, महिला मंडळाच्या सदस्या तसेच मुंबईहून आलेल्या मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून या सामाजिक कार्याला हातभार लावला.
बंधारा बांधणीसाठी आवश्यक असलेल्या ३०० पिशव्यांची व्यवस्था राजेश जोशी यांनी करून दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला मंडळानेही पुरुषांच्या बरोबरीने श्रमदानात सहभाग घेतला. गावाच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य ओळखून महिला आणि पुरुषांनी एकत्रितपणे केलेले हे कार्य सामाजिक एकोपा आणि गावाच्या विकासाप्रती असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणारे ठरले आहे.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळाचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांचे श्री. दीपक जोशी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे किती महत्त्वाचे आहे, याचा आदर्श तवसाळ-बाबरवाडी ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून घालून दिला आहे.


