(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश जारी केला असून, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (गट-अ) संवर्गातील सचिन इंगळी यांना उप संचालक भूमी अभिलेख (गट-अ) या वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची उप संचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या निवडसूची वर्षासाठी ही पदोन्नती देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या उपसचिव अश्विनी यमगर यांच्या स्वाक्षरीने ३० ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला. पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्याला नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू करून घेऊन त्याबाबत शासनाला अवगत करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, पुणे यांना देण्यात आले आहेत.
सचिन इंगळी यांच्या पदोन्नतीबद्दल प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी शिवप्रसाद गौरकर (उपअधीक्षक भूमी अभिलेख, चिपळूण), सोनल काळे (नगर भूमापन अधिकारी, रत्नागिरी), संभाजी मोतीबोने (उपअधीक्षक भूमी अभिलेख, दापोली), नरेंद्र गोरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख, रत्नागिरी), तिकोने (उपअधीक्षक भूमी अभिलेख, खेड), अनंत गवळी (उपअधीक्षक भूमी अभिलेख, मंडणगड), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.


