(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक म्हणून उदय जयकुमार झावरे यांनी नुकतेच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक महेश तोसरकर यांची दापोली पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात झावरे यांची बदली नुकतीच रायगड-अलिबाग येथून करण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र (कोकण भवन, नवी मुंबई) यांनी ३१ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही बदली निश्चित करण्यात आली. रायगडमधून कार्यमुक्त होत ११ जून २०२५ रोजी झावरे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात हजेरी लावली. त्यानंतर पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी त्यांची देवरुख पोलिस ठाण्यात नियुक्ती केली.
उदय झावरे यांनी याआधी संगमेश्वर पोलिस ठाण्यातही काही काळ सेवा दिली असून अंदाजे दोन वर्षांपूर्वी झावरे यांची संगमेश्वर पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली होती. मात्र काही वर्षानंतर पुन्हा झावरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षांच्या आदेशाने देवरुख ठाण्यात बदलीचे आदेश आल्याने संगमेश्वर तालुक्यात पुन्हा नियुक्ती झाली आहे. झावरे यांनी देवरुख पोलिस ठाण्याचा कार्यभार तत्काळ स्वीकारत, त्याबाबतचा पूर्तता अहवालही रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर केला आहे. झावरे हे अधिक गुन्हे दाखल करण्याऐवजी वाद सामोपचाराने मिटवण्याकडे कल दर्शवतात, की काटेकोर कायदेशीर कारवाईवर भर देतात, याबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात उत्सुकता आहे. विशेषतः लहानसहान वाद, कुटुंबीय भांडणं, रस्त्यावरचे तंटे अशा प्रकरणांमध्ये पोलीस समुपदेशनाची भूमिका घेतात का, याकडेही लक्ष लागले आहे.