(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपा मार्गावर कांजीवरा येथे मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आकाश चावरे (वय ३५, रा. मलकापूर, जि. कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश चावरे कामानिमित्त आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून देवरूख येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो दुचाकीवरून मलकापूरच्या दिशेने परत जात असताना कांजीवरा येथे हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की आकाश रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच त्या मार्गावरून जात असलेले देवरूखमधील सामाजिक कार्यकर्ते आकाश भोपळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील आकाशला तातडीने उचलून देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आकाशवर प्राथमिक उपचार केले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत नाजूक व चिंताजनक असल्याने अधिक उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन त्याला तातडीने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


