(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस भोसलेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सध्या उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीने पाणीटंचाईचे कारण देत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाचा सावळागोंधळ उघड झाला आहे. बुधवारी पाणी सोडल्यानंतर गुरुवारी बंद ठेवून शुक्रवारी पुरवठा होणे अपेक्षित होते. परंतु शुक्रवारी पाणी आले नाही आणि शनिवारीही नळ कोरडेच राहिल्याने सलग दोन दिवस नागरिक पाण्यावाचून वंचित राहिले.
यामुळे ‘एक दिवस आड पाणीपुरवठा’ म्हणजे नेमके काय, याबाबतच ग्रामपंचायत प्रशासनाला स्पष्टता आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षात एक दिवसाऐवजी दोन-दोन दिवस पाणी गायब राहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे.
भोसलेवाडी परिसरात पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्याने नागरिक पूर्णपणे नळपाणी योजनेवर अवलंबून आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा खंडित होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हा प्रकार कृत्रिम पाणीटंचाईचा असल्याचे बोलले जात आहे.
पाण्यासाठी महिलांना व वृद्धांना कडक उन्हात पायपीट करावी लागत असल्याने संताप आणखी वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

