(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण. या सणाची रंगत संगमेश्वरात नेहमी वेगळीच असते. या काळात गावात आलेल्या मुंबईकरांसह अनेकांनी आपल्या मायभूमीची आठवण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. कुणी सेल्फी तर कुणी ग्रुप फोटो काढून आनंद लुटला. परंतु या सेल्फी आणि छायाचित्रांमधून एक गंभीर बाब पुढे आली संगमेश्वर या तालुक्याच्या नावाचा केलेला अपभ्रंश.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या संगमेश्वर बसस्थानकावरील नावाच्या फलकावर “संगमेश्र्वर” अशी मोठी चूक झाली आहे. मागील दोन अडीच महिन्यांपासून जिल्हा तसेच स्थानिक एसटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपभ्रंश आता सर्वांच्या निदर्शनास आला आहे.
मराठीला राजभाषेचा दर्जा असताना तालुक्याच्या नावातील अशा उघड चुका पाहून नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. परप्रांतीयांनी नावाचा अपभ्रंश केला तर त्याला विरोध करणारे मराठीप्रेमी, मात्र स्वतःच्या प्रशासनाने केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्नही या निमित्ताने स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे.
नव्याने उभारलेल्या आगार इमारतीवरील दोन फलकांमध्ये ही चूक होती. व्यवस्थापनाला ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर एक फलक काढण्यात आला, मात्र दूरवरून सहज दिसणारा दुसरा फलक आजही चुकीचे नामनिर्देशन करीत आहे.
काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक बोरसे संगमेश्वरात आले असता पत्रकारांनी ही बाब मांडली. त्यांनी सदर चुकीला मान्य करत सांगितले की, दोन्ही फलक नव्याने तयार करून बसविण्यात येणार आहेत. तरीसुद्धा चुकीचा फलक काढण्यात होत असलेली टाळाटाळ प्रशासनाच्या दुर्लक्षाचे निदर्शक ठरत आहे.
मराठी भाषेच्या सन्मानाचा जयघोष करणाऱ्यांनी आणि जागरूक संगमेश्वरवासीयांनी आता या उदासीनतेचा समाचार घ्यायला हवा, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

