(कोलकाता)
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच, अशाच स्वरूपाची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोलकात्यातील एका नामांकित लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
हा प्रकार २५ जून रोजी रात्री १० ते १०.५० वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीत घडला. प्राथमिक चौकशीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि कॉलेजमधील दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडित तरुणीची जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.
२६ जून रोजी आरोपींना अटक
पीडितेने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. त्यानुसार, २६ जून रोजी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.
राजकीय संबंध आणि पक्षाची भूमिका
या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेचा माजी अध्यक्ष आणि दक्षिण कोलकाता शाखेचा माजी संघटन सचिव आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने आरोपीशी कोणताही सध्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट करत, दोषी आढळल्यास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
कोलकाता पोलीस विभागाने या घटनेचा अधिक सखोल तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पुरावे गोळा केले जात आहेत.