(पुणे / वृत्तसंस्था)
आपली मुलगी लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याच्या समजुतीत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील एका कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एमबीएच्या शिक्षणासाठी युनायटेड किंगडमला गेलेली ३४ वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख ही तरुणी प्रत्यक्षात भारतात परतली होती. अचानक तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटल्यानंतर शोध सुरू झाला आणि बँक खात्यातील “ब्लिंकिट” डिलिव्हरीच्या एका व्यवहाराने तिचे पुण्यातील वास्तव्य उघड झाले. त्यानंतर पुण्यातील गहुंजे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील एका निवृत्त अभियंत्याची ही मुलगी उच्च शिक्षणासाठी जुलै 2025 मध्ये लंडनला गेली होती. युकेमधील मोबाईल क्रमांकावरून ती नियमितपणे कुटुंबीयांच्या संपर्कात होती. 23 ऑक्टोबर रोजी तिने आईशी फोनवर संवाद साधला होता. यावेळी तिने एका मुलाखतीचा उल्लेख केला; मात्र त्यानंतर अचानक तिने फोन बंद केला. 24 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत वारंवार संपर्क करूनही तिच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. तिचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांची चिंता वाढली.
तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या तिच्या एका मित्राशी संपर्क साधला. त्याने तेथील स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ऑगस्ट महिन्यातच युकेमधून भारतात परतली होती. मात्र, तिने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. हे समजल्यानंतर कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी सुरू केली. ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण आणि प्रवास बुकिंगशी संबंधित अलीकडील व्यवहारांची माहिती तपासण्यात आली. तपास दरम्यान पोलिसांनी मुग्धा यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि डिजिटल फुटप्रिंट्स तपासले. त्यात भारतातील झोमॅटो (Zomato), ब्लिंकिट (Blinkit) आणि स्विगी (Swiggy) सारख्या ऑनलाइन फूड ॲप्सवर त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये ब्लिंकिटच्या माध्यमातून झालेला एक व्यवहार पोलिसांच्या निदर्शनास आला. या व्यवहारामुळे तरुणी कुटुंबीयांना माहिती न देता भारतातच राहत असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर तांत्रिक तपास आणि ऑनलाइन व्यवहारांचे विश्लेषण करून पोलिसांनी पुण्यातील गहुंजे परिसरातील ‘लोढा बेलमोंडो’ या निवासी संकुलातील भाड्याच्या फ्लॅटचा पत्ता शोधून काढला.
त्यानुसार स्थानिक पोलीस पथक संबंधित फ्लॅटवर पोहोचले. मात्र, दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी अनेकदा दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर दरवाजाचे कुलूप तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी आत एका महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला. तपासात संबंधित तरुणीने ऑगस्ट महिन्यात एका एजंटच्या माध्यमातून हा फ्लॅट भाड्याने घेतल्याचेही समोर आले. तिने 21 ऑक्टोबर रोजी कामावर असलेल्या मोलकरणीलाही काम बंद करण्यास सांगितले होते.
पुणे पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार प्रथमदर्शनी आत्महत्येचा असल्याचे दिसत आहे. मात्र, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.


