(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात घडला. ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अजय अशोक सुतार (वय २९, रा. वालोटी वाडी, चिपळूण) असे मृताचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेलर चालक पृथ्वीनाथ बाबूनाथ (वय ४२, रा. राजस्थान) हा ट्रेलर घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जात होता. सावर्डे बाजारपेठेत त्याने गाडी थांबवली होती. याच वेळी चिपळूणहून येणाऱ्या अजय सुतार याने आपल्या दुचाकीवरून येत असताना उभ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक एवढी तीव्र होती की अजय सुतार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत ती सुरळीत केली.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, सावर्डे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.