(खेड)
तालुक्यातील पर्शुराम घाट समाप्तीजवळील होयवे ब्रिजवर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जेसीबी टेलीस्कोपीक मशीनचे मोठे नुकसान झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २४ जून रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी टेलीस्कोपीक हॉन्डलर (क्र. एम.एच.०८ ए.एक्स ०४९९) हे वाहन चालक प्रकाश भिमाप्पा लमाणी (वय ३२, रा. बासवान बागेवाडी, ता. जि. विजापूर, कर्नाटक) यांनी निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे चालवले. त्यामुळे वाहन थेट मुंबई-गोवा महामार्गावरील होयवे ब्रिजवर रस्त्याच्या कठड्यावर आदळले. या अपघातात लमाणी हे स्वतः गंभीर जखमी झाले, तर वाहनाचे स्टेअरिंग, मोठा टायर, दोन काच व स्टेअरिंग रॉड पूर्णतः खराब झाले असून जेसीबीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी जेसीबीचे मालक व कंत्राटदार सुबोध सखाराम चाळके (वय ३३, रा. पिरलोटे दत्तवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ) व १२५(३) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १९७/२०२५) २५ जून रोजी सायंकाळी ४.४९ वाजता खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे..