(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत परिसरातील औद्योगिक निष्काळजीपणामुळे घडलेल्या गंभीर दुर्घटनेत भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संबंधित कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनी मालकासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, औद्योगिक सुरक्षेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शकुंतला बबन सोनावणे (वय ४८) असे आहे. त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मानेचीवाडी येथील रहिवासी असून सध्या चिपळूणमधील बहादुरशेख नाका येथे वास्तव्यास होत्या. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या नातेवाईकांसह पुष्कर कंपनीच्या बाजूच्या आवारात कचरा गोळा करण्यासाठी गेल्या असता कंपनीकडून उघड्यावर टाकण्यात आलेल्या रसायनयुक्त गरम मातीमध्ये त्या रुतल्या. या घटनेत त्या कमरेखालून गंभीर भाजल्या गेल्या. प्राथमिक उपचारासाठी त्यांना खेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच २२ मार्च रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ललिता चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीचे मालक गौतम मखारिया, सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एचआर मॅनेजर सचिन रामकृष्ण मनवाल, कमर्शियल मॅनेजर रवींद्रकुमार सावरमल भूतिया तसेच अन्य संबंधित व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खेड पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १०५ आणि ३(५) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात रासायनिक पदार्थांची विल्हेवाट आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर दुर्लक्ष झाल्यास त्याचे मानवी जीवितावर किती भीषण परिणाम होऊ शकतात, याची ही घटना पुन्हा एकदा ठळक जाणीव करून देणारी ठरली आहे.

