(खेड)
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांना सीएसआर निधीतून लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा कर्टेल गावचे सुपुत्र सरपंच दिनेश परशुराम चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि शिक्षण अधिक सक्षम करणे हा आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
लॅपटॉप वाटप कार्यक्रम चंदी हवेली येथील प्रशस्त हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सरपंच दिनेश चव्हाण, कळंबणीचे सरपंच भगवान साळुंखे, सरपंच दयानंद पाष्टे, विस्तार अधिकारी संतोष भोसले, सुनील सावंत, संतोष चव्हाण, कोळेकर सर, मगदूम सर, दळवी सर, खोपडे सर, घाग सर, शिंदे सर, तांबट सर, सौरभ जाधव तसेच ग्रामस्थ आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
राज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी होता. मात्र त्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. तसेच योगेश कदम अधिवेशनात व्यस्त असल्याने कार्यक्रम साध्या स्वरूपात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्टेलचे सरपंच दिनेश चव्हाण यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमासाठी चंदी हवेलीचा हॉल उपलब्ध करून देण्यासाठी कळंबणीचे सरपंच भगवान साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले.
शेवटी स्थानिक सरपंच भगवान साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

