( खेड / वार्ताहर )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कशेडी गावचे निष्ठावंत शाखाप्रमुख तथा बीएलए, खवटी पंचक्रोशी हायस्कूलचे संचालक आणि होमगार्ड सेवेत कर्तव्यदक्षपणे योगदान देणारे कशेडी गावचे सुपुत्र लहू गोपाळ सुर्वे यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कशेडी गावासह खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लहू सुर्वे हे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. अन्यायाविरुद्ध ठामपणे भूमिका घेण्यासोबतच गरजू व्यक्तींना सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती होती. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक कार्यातही त्यांनी निष्ठेने योगदान दिले. शाखाप्रमुख आणि बीएलए म्हणून त्यांनी पक्षाच्या तळागाळातील संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
खवटी पंचक्रोशी हायस्कूलच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना शैक्षणिक क्षेत्राशीही त्यांचा जवळचा संबंध राहिला. तसेच होमगार्ड म्हणून सेवा बजावताना त्यांनी कर्तव्यनिष्ठेची ओळख निर्माण केली.
त्यांच्या आकस्मिक निधनाने एक सहृदयी, सेवाभावी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. “जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे त्यांचे प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील, अशा भावना त्यांच्या परिचितांकडून व्यक्त करण्यात आल्या.
लहू सुर्वे यांच्या पार्थिवावर मुंबई-नालासोपारा येथे आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

