(लांजा / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातप्रकरणी कंटेनर ट्रकच्या चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या अपघातात हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह कंटेनर चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे हे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी अपघातात जखमी झालेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे (वय ३६, रा. रत्नागिरी शहर पोलीस वसाहत) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आंजणारी पुलाखाली नदीपात्रात वाहन कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्यासाठी शिंगाडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड हे शासकीय वाहनातून (क्रमांक MH 08 BE 3561) घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर ट्रक (क्रमांक RJ 09 GE 2397) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात येत होता. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या शासकीय वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहने पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत शासकीय वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड, कंटेनर चालक मदन हेम सिंह (वय ४१, रा. राजस्थान) आणि क्लिनर दिनेश महेंद्र सिंह (वय १५, रा. राजस्थान) यांचा मृत्यू झाला. तर पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले.
या अपघातासंदर्भात लांजा पोलिसांनी मृत ट्रकचालक मदन सिंह याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


